लातूर : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील शिऊर ते नदीवाडी हा पाणंद रस्ता मंजूर असूनही या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. रस्त्याचे काम न झाल्यास गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तांत्रिक सहायक यांना त्यांची पगार न काढण्याचे आदेशीत करुनही सदर रस्त्याचे काम अद्याप झालेले नाही. त्यामुळे नदीवाडी व शिऊर या दोन्ही गावच्या ग्रामस्थांना ये -जा करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याचे काम तात्काळ करून देण्यात यावे, व मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाला विलंब लावणा-या सरपंच, ग्रामसेवक व तांत्रिक सहायक यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, या मागणीसाठी १८ फेब्रुवारी पासून आठ शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणकर्त्यामध्ये तीन महिला शेतक-यांचा समावेश आहे.
मातोश्री योजने अंतर्गत शिऊर ते नदीवाडी हा पाणंद रस्ता दोन वर्षाचा कालावधी उलटला. निलंगा पंचायत समिती समोर अनेकवेळा अर्ज, विनंत्या केल्या. २४ सप्टेंबर २०२४ ला उपोषण केले असता एक महिन्याच्या आत रस्त्याचे काम पूर्ण करतो म्हणून बिडीओने लेखी आश्वासन दिले. मात्र अद्याप रस्त्याचे काम झालेले नाही. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप, दडपशाहीची भूमिका दिसून येत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
या रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा आणि रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी अरुण अष्टुरे, भरत सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, आत्माराम सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, नामदेव तुगावे, श्रीमंत काथे, गणेश काथे, सुशीलाबाई अष्टुरे, रामदास सूर्यवंशी, भारतबाई काळे, बालाजी तुगावे, सुलोचना तुगावे, सरोजा अष्टुरे, शिवराज अष्टुरे आदी शेतकरी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.