लातूर : प्रतिनिधी
शिक्षणाचा लातूर पॅटर्न सर्वोदुर सुप्रसिद्ध असल्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेरुन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात लातूरला येतात. या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना शिकवणी वर्ग, वस्तीगृह, मेसापासून ते खोली भाड्याने देण्यापर्यंतच्या एकुण प्रक्रियेत दलालांचा वावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिकवणी वर्ग परिसर अक्षरश: दलालांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरातील शिवनगर परिसरात अनेक नामवंत शिकवणी वर्ग चालतात. या शिकवणी वर्गात पी. सी. बी., पी. सी. एम. यासह युपीएससी, एमपीएससीची तयारी करुण घेणारे शिकवणी वर्ग चालतात. नीट आणि एमएचठी सीईटीच्या परिषेत या शिकवणी वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी, विद्यार्थीनी उत्तीर्ण होऊन आपल्या देशातील चांगल्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळावतात. त्यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या शहरांच्या तुलनेत लातूर शहरात मिळणा-या सोयी-सुविधा कमी असल्यातरी केवळ शिक्षणासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येथे येतात.
शिकवणी वर्गाच्या परिसरात विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी शिकवणी वर्गासह वसतीगृह, मेस, भाड्याने मिळणा-या खोल्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. शिकवणी वर्गाला प्रवेश घेतला की, अनेकजण राहण्यासाठी वसतीगृह किंवा रुम शोधत असतात. नेमका याचाच फायदा घेणारी कमिशन एजंटाची मोठी लॉबी या परिसरात सक्रीय आहे. एखादा पालक पाल्याला घेऊन वसतीगृह शोधत निघाला असेल तर त्याच्या मागे हे दलाल लागतात. अक्षरश: हाताला धरुन ओढण्यापर्यंत यांची मजल जात असल्याने पालकदेखील भांबावून जातात. या वसतीगृहापेक्षा ते वसतीगृह कसे चांगले, ती रुम कशी बरी ते अमुक-तमुक शिकवणी वर्ग कसा उत्तम, याचे गाईड असल्यासारखे वर्णन हे दलाल करीत असतात. दलालांच्या या वर्तणुकीचा शिकवणी वर्ग परिसरातील नागरिकांना सर्वाधिक त्रास होत आहे. त्यामुळे या दलालांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे. विशेषत: दलालांच्या या वागण्याबद्दल बाहेरील जिल्ह्यातील पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिकवणी वर्गाच्या परिसरातील सध्याची स्पर्धा इतकी टोकाला गेली आहे की, विद्यार्थ्यांसोबत आता नामवंत महाविद्यालयांतील प्राध्यापकांना आपल्या शिकवणी वर्गासाठी घेण्यासाठी चक्क दलालांचा वापर केला जात आहे. त्यासाठी मोठ्या रकमा दिल्या जातात. नीट आणि एमएचटी सीईटीमध्ये आमच्याच शिकवणी वर्गाचे जास्तीत जास्त विद्यार्थी, विद्याथीनी उत्तीर्ण होतात. त्यामुळे त्यांना चांगल्यातल्या चांगल्या वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्रवेश मिळतो, अशा जाहिरातील शिकवणी वर्गांचे संचालक मोठ्या प्रमाणात करतात. आता त्यासाठी दलालांचाही वापर सुरु झाला आहे.