नंदुरबार : प्रतिनिधी
निवडणुका आल्या की शिक्षकांना कामे लागतात हे ठरलेलेच आहे. तसेच सरकारी योजनांचा आढावा, माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची कामेही शिक्षकांना दिली जातात. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी पालकांकडून होत असतात. यावर आता निर्णय घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
राज्यातील शिक्षकांची किमान ५० टक्के अशैक्षणिक कामे कमी करण्याचा निर्णय येत्या १५ दिवसांतच घेण्यात येईल, जि. प. शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविण्याचे आव्हान आहे. यासाठी शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बहुसंख्य जिल्हा परिषद शिक्षक नवीन उपक्रम राबवून गुणवत्ता वाढवीत आहेत, ते राज्यभरातील शाळांमध्ये अंमलबजावणी करून व राज्यात अशा शिक्षकांची ‘आयडॉल बँक’ तयार करण्याचा मानस समोर ठेवला आहे.
सुट्यांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांनी पालकांशी संवाद साधून नवीन उपक्रमांबाबत पालकांना माहिती द्यावी, जेणेकरून पटसंख्या वाढीत मदत होईल व जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता व पटसंख्या टिकून राहील, यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.
गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करावे
शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण निर्णय आगामी काळामध्ये घेण्यात येणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे गणवेशाचे पैसे मे महिन्यातच वितरीत करण्यात येणार आहेत. तसेच ज्या शाळांना इमारती नाहीत, वर्गखोल्या नाहीत अशा ठिकाणी इमारती, वर्गखोल्या उभारणीसाठी शासन प्रयत्नशील असून, यासाठी विविध सेवाभावी संस्थांचीदेखील मदत घेण्यात येणार असल्याचे दादा भुसे म्हणाले. वास्तवात सध्या जिल्हा परिषद, नगरपालिका त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे पटसंख्या टिकविण्याचे आव्हान समोर आहे. अशा परिस्थितीत सर्व शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासोबतच गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दादा भुसे यांनी दिले आहेत.
सुट्यांमध्ये पालकांशी सुसंवाद साधा
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविले जाणारे उपक्रम नावीन्यपूर्ण असतात. मात्र याबाबत पालकांना पुरेशी माहिती नसते. यामुळे सुट्यांमध्ये पालकांशी संवाद साधा. राबविल्या जाणा-या उपक्रमांची माहिती द्या, अनेक शाळा लोकसहभागातूनच उभ्या राहिल्या आहेत. शाळेत गुणवत्ता असल्याची पालकांना जाणीव झाल्यास नक्कीच पटसंख्या वाढीसाठीदेखील मदत होणार असल्याचा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला.