सोलापूर-जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सीईओ) स्मिता पाटील यांच्या विरोधात शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेबाबत केलेल्या तक्रारीवरून विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे कार्यालयाने चौकशीचे आदेश जारी केले आहेत. हा एक कार्यालयीन कामातील चौकशीचा भाग असतो. त्यामुळे हा विषय गंभीर नसल्याचा खुलासा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला.
याबाबतचा अहवाल दरम्यान, तयार करून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी शिक्षण उपसंचालक (पुणे) अहिरे यांच्याकडे पाठविल्याचेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय काम कामकाजातील काही विषय गोपनीय असतात, असे पत्र जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या इनवर्डला का आले नसावे? इतकेच नाहीतर असे पत्र थेट माध्यमांकडे व्हायरल झालेच कसे? याबाबतही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, एखाद्या पदाचा अतिरिक्त पदभार घेतल्यावर महत्वाच्या पेंडिंग कामांचा निपटारा करावाच लागतो. प्रशासकीय टिपण्या, शिक्षक मान्यता या मी अभ्यासपूर्ण केल्या आहेत. जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप
यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वरील विषयांबाबत दि. २ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या मोबाईल वॉटस्अॅपवर आलेल्या पत्रान्वये असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी मारूती फडके हे रजेवर गेल्यानंतर डेप्युटी सीईओ पाटील यांच्याकडे प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला होता. हा कार्यभार सांभाळत असताना शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देताना टिपणी टाकणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ते अंतिम आदेश पारीत करणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पाटील यांनी दिलेल्या मान्यतेबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना शिक्षण उपसंचालक अहिरे यांनी दिले होते.
त्यानुसार आम्ही आमचा अहवाल शिक्षण उपसंचालकांना पाठविला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.वरील प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी; अशा केलेल्या तक्रारीवरुन हा प्रकार समोर आला असल्याचा निर्वाळा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी शेवटी दिला.