लातूर : प्रतिनिधी
शिक्षण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शिक्षण आणि ज्ञान केवळ वैयक्तिक विकासासाठी आवश्यक नाही, तर अर्थव्यवस्थेच्या विकासासाठीही आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उद्याच्या भारताचा आदर्श नागरिक घडविण्यात योगदान द्यावे, असे आवाहन आमदार विक्रम काळे यांनी केले.
संत ज्ञानेश्वरनगरातील तुळजाभवानी शैक्षणिक संकुलाचे उडान-२०२५ वार्षिक स्रेहसंमेलन स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात पार पडले, त्यावेळी उद्घाटनपर भाषणात आमदार काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे होते. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, माजी नगरसेवक राजकुमार जाधव, प्रा. अंकुश नाडे, प्रा. राजकुमार मगर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंचावर तुळजाभवानी शैक्षणिक संकुलाच्या सचिव के. ए. जायेभाये, राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, संस्थेच्या संचालक प्रा. कविता केंद्रे, राजेंद्र जायेभाये, सोनिया जायेभाये, तुळजाभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जी. आर. मुंडे, तुळजाभवानी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, यांची उपस्थिती होती.
शिक्षण एखाद्या व्यक्तीला विचार करण्याची, कृती करण्याची आणि जीवनात आपला विकास करण्याची संधी देते, असे सांगून आमदार काळे म्हणाले, या संकुलात सर्वसामान्य, गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येते. अनेक जुन्या संस्थांना मागे टाकत या संकुलातील विद्यार्थी सिल्वर, गोल्ड मेडलला गवसणी घालत आहेत, ही बाब कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. तहसीलदार तांदळे म्हणाले, शिक्षण हे खूप महत्त्वपूर्ण असून शिक्षण हे लोकांना योग्य दिशा दाखवते, त्यांना विकसित करते. ते काम या संकुलात होत आहे, ही बाब स्तुत्य असल्याचे म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य केंद्रे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी स्रेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संकुलात ‘के. जी. टू पी. जी.’ पर्यंत शिक्षणाची सोय आहे. या विद्यालयाचा गतवर्षीचा दहावीचा निकाल ९८ टक्के लागला आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात या शाळेला तालुकास्तरावरील तृतीय पुरस्कार मिळाला आहे, असे सांगितले. पीपीटी सादर करून प्रास्ताविकात मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे यांची शाळेचा चढता शैक्षणिक आलेख उपस्थितांसमोर मांडला. यावेळी विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, एकांकिका व विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. विविध स्पर्धेतील खेळाडूंचे कौतुक करण्यात आले.