31 C
Latur
Sunday, February 2, 2025
Homeमहाराष्ट्रशिक्षण, तंत्रज्ञानाने मराठी भाषेचे भविष्य घडणार

शिक्षण, तंत्रज्ञानाने मराठी भाषेचे भविष्य घडणार

पुणे : प्रतिनिधी
मराठीला अभिजात दर्जा पूर्वसंचितामुळे मिळाला आहे. आता पुढील वाटचाल सर्वांना मिळून करावी लागणार आहे. शिक्षण, तंत्रज्ञानाची कास धरून मराठी भाषेचे भविष्य घडणार असल्याचा सूर ज्येष्ठ साहित्यिकांनी व्यक्त केला.

विश्व मराठी संमेलनात ‘माझी मराठी अभिजात झाली’ या विषयावर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे डॉ. सदानंद मोरे, ज्ञानेश्वर मुळे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सहभाग घेतला. भूषण करंदीकर यांनी संवाद साधला.

मधू मंगेश कर्णिक म्हणाले, मराठीच्या अडीच हजार वर्षांच्या संचितावर मराठी अभिजात झाली. पण आजच्या व्यवहारातील मराठी अभिजात आहे का, उद्याची मराठी कशी असेल याची भीती वाटते. मराठीविषयी आस्था आहे म्हणून मंत्री भाषेच्या उद्धाराविषयी बोलतात. मराठीच्या विकासाचा समग्रपणे विचार सरकारने केला पाहिजे.

डॉ. मोरे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता हीदेखील एक भाषाच आहे. मोठ्या कंपन्या एआयसाठी प्रचंड गुंतवणूक करतात. तशी गुंतवणूक झाल्यास मराठीसाठीही काम करता येईल. मुळे म्हणाले,अमेरिका, इस्रायल, इंग्लंड, मॉरिशस या चार देशांमध्ये मराठीची मुद्रा अधिक चांगली आहे. परदेशातील मराठीजन मराठी भाषेविषयी सजग आहेत. परराज्यांतील मराठी लोक तहानलेले आहेत.आता महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र आणि परदेशातील महाराष्ट्राकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR