शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ तालुक्यात जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या एकूण ७८ अर्जांपैकी गुरुवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत ६८ अर्ज वैध तर १० अर्ज अवैध ठरल्याने ते बाद झाले आहेत, जिल्हा परिषदेसाठी एकूण २५ उमेदवारी अर्ज वैध तर पंचायत समितीसाठी ४३ उमेदवारी अर्ज वैध असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अहिल्या गाठाळ तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार भगवान गवळी यांनी दिली. छाननीनंतर अपूर्ण कागदपत्रे, नियमबा माहिती तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे काही अर्ज बाद करण्यात आले असल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषद येरोळ गट ९, जिल्हा परिषद साकोळ गट १६ तर येरोळ पंचायत समिती गण ५, हिप्पळगाव पंचायत समिती गण सर्वाधिक १८, साकोळ पंचायत समिती गण ८ तर हिसामाबाद गणामध्ये १२ अर्ज वैध ठरले आहे. छाननी प्रक्रियेच्यावेळी तहसील कार्यालय परिसरात उमेदवार, प्रतिनिधी व समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
प्रत्येक अर्जाची बारकाईने तपासणी करण्यात आल्याने प्रक्रिया पारदर्शक व नियमांनुसार पार पडल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. छाननीनंतर आता उमेदवारी माघार प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले असून माघार कालावधी पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक रिंगणातील अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. वैध उमेदवारांच्या संख्येमुळे काही गटांमध्ये अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्पे सुरळीत पार पडावेत यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

