शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यात यंदा पेरणी झालेल्या बहुतांश भागातील सोयाबीन पीक सध्या जोमदार वाढीच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी पिकाला बहर आला आहे. त्यामुळे शेतकरी आंतरमशागतीची कामे, तणनियंत्रण, खते देणे आणि पिकांच्या संरक्षणासाठी फवारणी करण्यात व्यस्त आहेत. मात्र तालुक्यातील काही भागात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरणीची कामे सुरूच आहेत. पावसाच्या खंडामुळे उशिरा पेरणी करणा-या शेतक-यांची धावपळ सुरू असून योग्य पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, सध्या सोयाबीन पिकासाठी तणनियंत्रण, संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड-रोगांवर वेळेवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. हवामान अनुकूल राहिल्यास यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात आंतरमशागतीची कामे करीत असून पिकांची नियमित पाहणी करीत आहेत. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास उर्वरित पेरणीही पूर्ण होऊन खरीप हंगामाला अधिक गती मिळेल.
















