शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तीन मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील ८४६ मतदारांपैकी ५३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे तालुक्यात एकूण ६३.५९ टक्के मतदानाची नोंद झाली. तालुक्यात सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. शिरूर अनंतपाळ मतदान केंद्रावर ४१३ पैकी २६८, साकोळ येथे २१६ पैकी १४० तर हिसामाबाद येथे २१७ पैकी १३० मतदारांनी मतदान केले. दरम्यान यंदा मतदार नोंदणी व तसेच मतदानमध्येही पदवीधर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. परिणामी यंदा मतदानाचा टक्का घसरला आहे.
गेल्या २०२० च्या पदवीधर निवडणुकीत ९४४ मतदारांपैकी ७०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्याची ७५ टक्के मतदान एवढी नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी घटली आहे. पदवीधर मतदार, शिक्षक, विविध शासकीय कर्मचारी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. पदनिर्देशित अधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी संदेश सालके, एस.एम. डांगे, केंद्राध्यक्ष तथा एबीडीओ रवींद्र साचने, नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे, रामानंद कोटेकर, गोरखनाथ पदकोंडे आणि इतर कर्मचा-यांनी मतदान प्रक्रियेची जबाबदारी पार पाडली. दरम्यान, डीवायएसपी अक्षय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
















