25.5 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रशिरोळ तालुक्यात महाप्रसादातून २०० जणांना विषबाधा

शिरोळ तालुक्यात महाप्रसादातून २०० जणांना विषबाधा

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे यात्रेतील महाप्रसाद खाल्ल्याने जवळपास २०० जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. गावातील प्रत्येक घरात दोन-तीन जणांना मध्यरात्रीपासून वांती, जुलाब सुरू झाले. इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात लहान मुलांसह महिला, पुरुष व वृद्ध अशा सुमारे १०० जणांवर सध्या उपचार सुरू असून त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे.

संपूर्ण गावावरच प्रसंग ओढवल्याने शिवनाकवाडी परिसरासह इचलकरंजीतील काही खाजगी रुग्णालयांतही रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. याबाबत रुग्णालय व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे मंगळवारी ग्रामदैवत श्री कल्याणताई माता देवीची यात्रा होती. यात्रेनिमित्त दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गावाने या महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

मध्यरात्रीनंतर काहीजणांना जुलाब आणि वांती सुरू झाल्या. पहाटेपर्यंत संपूर्ण गावालाच ही बाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी अशा रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु बाधितांची संख्या वाढतच चालल्याने त्यांना आसपाससह इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने तातडीने यंत्रणा गतिमान करत सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, परिचारक, कर्मचारी यांना एकत्र बोलावून उपचार यंत्रणा कार्यान्वित केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR