25.7 C
Latur
Monday, February 3, 2025
Homeमुख्य बातम्याशिर्डीत एकाच इमारतीत ७ हजार मतदार : राहुल गांधी यांचा दावा

शिर्डीत एकाच इमारतीत ७ हजार मतदार : राहुल गांधी यांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेला महाराष्ट्रात इंडिया आघाडीला चांगले यश मिळते मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव होतो. या निवडणुकीत हिमाचल प्रदेशची जितकी लोकसंख्या आहे तितक्या नव्या मतदारांची नोंदणी मतदार यादीत केली जाते. लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या काळात ७० लाख नवीन मतदार समाविष्ट करण्यात आले असे सांगत काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपासह निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभे केले. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जितके ५ वर्षात मतदार जोडले गेले नाहीत तितके शेवटच्या ५ महिन्यात जोडले गेले. शिर्डीच्या एका इमारतीत ७ हजार नवमतदार वाढले. मी कुठला आरोप करत नाही, परंतु काही ना काही संशयास्पद आहे हे दिसते.

भयमुक्त निवडणुकीसाठी ‘ईगल टीम’
सध्या दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. यापाठोपाठ बिहारची निवडणूक देखील होणार आहे. दरम्यान, देशात यापुढे होणा-या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी कॉँग्रेस पक्षाने एक मोठे पाऊल उचलले आहे. कॉँग्रेसने ‘ईगल’ (एम्पॉवर्ड अ‍ॅक्शन ग्रुप ऑफ लिडर्स अ‍ॅँड एक्सपर्ट) टीमची स्थापना केली आहे. या टीमला पहिले काम हे महाराष्ट्रातील देण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या मतदार यादीतील फेरफार याबद्दल कमिटी हायकमांडला रिपोर्ट सादर करणार आहे. याबाबत कॉँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी पत्रक काढले आहे. ईगल टीममध्ये अजय माकन, दीग्विजय सिंह, अभिषेक सिंघवी, प्रवीण चक्रवर्ती, पवन खेडा, गुरदीप सप्पल, नितीन राऊत, चल्ला रेड्डी या ८ सदस्यांचा समावेश आहे.

५० लाख मतदार कसे वाढले?
नाना पटोले म्हणाले की, दिल्लीतील काही काँग्रेस नेते २५ जानेवारी रोजी महाराष्ट्रात येऊन माध्यमांशी संवाद साधतील. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या ६ महिन्यांत मतदारांची संख्या ५० लाखांनी कशी वाढली आणि मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर अचानक ७६ लाख मते कशी वाढली? पारदर्शकतेच्या मागण्या असूनही, निवडणूक आयोगाने कोणताही डेटा प्रदान केला नाही. आता, सामान्य माणसाला मतदानाची माहिती देण्यास मनाई करणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR