अहिल्यानगर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा देत उद्योग जगताला आणि उद्योजकांना पाठबळही दिले. त्याच धर्तीवर आता श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणा-या साईबाबांच्या शिर्डीत देखील देशाच्या संरक्षणासाठी लागणा-या बॉम्ब शेल्सची निर्मिती देखील होणार आहे. त्याच अनुषंगाने शिर्डी एमआयडीसीमध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमीपूजन सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पार पडला. दरम्यान, शिर्डीत टाटा उद्योग समुहाचा देखील एक प्रकल्प लवकरच सुरू होईल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला साजेसा महत्वाचा प्रकल्प शिर्डी येथे विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये उभा राहत आहे. ग्लोबल फोर्ज कंपनीच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणा-या अत्याधुनिक बॉम्ब शेल्सचे उत्पादन या प्रकल्पातून होणार आहे. इथे उत्पादित होणारे बॉम्ब शेल्स भारतीय संरक्षक व्यवस्थेसह मित्र राष्ट्रांना पुरवले जाणार आहेत. येणा-या काळात भारत हा जगाला मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्य पुरवणारा देश बनेल, असा विश्वास ग्लोबल फोर्ज कंपनीचे संस्थापक गणेश निबे यांनी यावेळी व्यक्त केला.
साईबाबांच्या पावन भूमीत हा प्रकल्प सुरू होत असल्याचा आनंद आहे. डिफेन्स क्लस्टरसह शिर्डी एमआयडीसीत टाटा उद्योग समूहाचा एक प्रकल्प देखील सुरू होतोय. शिर्डी एमआयडीसीमध्ये परिसरातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. येणा-या काळात शिर्डीचा चेहरामोहरा बदलेला दिसेल, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भूमिपूजन सोहळ्यावेळी म्हटलं.