शिर्डी : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर आज नगर जिल्ह्यामध्ये अनेक उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे भाजपमध्ये बंडखोरी होण्यास सुरुवात झाली असून, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.
खासदार नीलेश लंके यांचा पत्नी राणी लंके यांनी शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे. नगर जिल्ह्यात आजी-माजी आमदारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचे दिसून आले.भाजपाचे डॉ. पिपाडा यांनी लगेच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या तिस-या दिवशी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर शिर्डीतून भाजपचे विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे, राहुरीतून माजी मंत्री शिवाजी कर्डिले, शेवगावमधून मोनिका राजळे, तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे, संग्राम जगताप यांनी अकोले व नगर शहर मतदारसंघ यांनी अर्ज दाखल केले. तसेच शिर्डीमधून डॉ. राजेंद्र पिपाडा, तर शेवगावमधून हर्षदा काकडे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे, दिलीप खेडकर यांनीही अर्ज भरले आहेत.