लातूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी लातूर येथे ‘जय शिवाजी, जय भारत पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दि. १७ फेबु्रवारी रोजी येथे केले. पदयात्रा पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथून सकाळी ९ वाजता ‘जय शिवाजी, जय भारत पदयात्रा’ सुरु होणार आहे. त्यानंतर विविध उपक्रमांचे सादरीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्यानंतर या पदयात्रेचा समारोप होणार आहे. यामध्ये पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थी, अधिकारी, कार्चारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यावेळी पोवाडा सादरीकरणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.