29.5 C
Latur
Friday, April 18, 2025
Homeमहाराष्ट्रशिवतीर्थावर शिंदे-राज ठाकरे भेट

शिवतीर्थावर शिंदे-राज ठाकरे भेट

बीएमसी निवडणुकीपूर्वी बंद दाराआड चर्चा

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यातच उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी, १५ एप्रिल रोजी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दिलेल्या सदिच्छा भेटीने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघात शिंदे गटाचे सदा सरवणकर हे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्याविरोधात मैदानात उतरले होते. सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे दोघांमध्ये काहीसा राजकीय दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात होते. मात्र, यावेळच्या भेटीने दोघांमधील संबंधांमध्ये मुरलेली ताणतणावाची सल काहीशी निवळली असल्याचे संकेत मिळत आहेत.

ही एक सदिच्छा भेट होती : एकनाथ शिंदे
राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी ही बैठक सुमारे दोन तासांहून अधिक काळ चालली. यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘ही पूर्णपणे सौहार्दपूर्ण भेट होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे. काही कारणांनी आमची भेट थांबली होती, ती आज झाली. प्रत्येक भेटीला राजकीय रंग देणे योग्य नाही.

शिवसेना-मनसे एकत्र आल्यास आनंद : उदय सामंत
या भेटीवर प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी गेले म्हणजे त्याचा काही ना काही राजकीय अर्थ असणार. मात्र, जर राज ठाकरे आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागतच होईल. शिंदे आणि राज ठाकरे यांचे संबंध खूप जुने आहेत.

राजकीय समीकरणांच्या शक्यता वाढल्या
राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत निर्णायक ठरू शकते. शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे एकत्र आल्यास भाजपप्रणीत युतीसाठी ती एक मोठी ताकद ठरू शकते. यामुळे विरोधकांसमोरही नवे आव्हान उभे राहू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR