लातूर : प्रतिनिधी
रयतचे राजे, बहुजन प्रतिपालक कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती दि. १९ फेब्रुवारी रोजी लातूर शहरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुर्णाकृती अश्वरुढ पुतळ्यासमोर हजारो शिवभक्त नतमस्तक झाले. चौका-चौकात शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शिवगर्जनेने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. सायंकाळी निघालेल्या भव्य, दिव्य मिरवणुकांनी उत्साहात रंग भरला. गगनभेदी जयकारात शिवभक्तिला उधाण आले होते. शिवभक्तीचा सळसळता उत्साह ओसंडून वाहत होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लातूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण शहर शिवमय झाले होते. शहरात विविध ठिकाणी मंच उभारुन त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, पुतळा विराजमान करुन अभिवादन करण्यात आले. लहान, थोर, तरुण, तरुणी सर्वच जन भगव्या पताका हातात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. संपूर्ण शहरात शिवरायांचा जयजयकार होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थान परिसरातून दुचाकी रॅली काढली. रिंग रोड, गरुड चौक, स्वामी विवेकानंद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक, गंजगोलाई, सराफ लाईन, जुने गुळ मार्केट चौक, महात्मा गांधी चौक, मिनी मार्केट चौक, लोकमान्य टिळक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत तरुणांचा मोठा सहभाग होता. ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘राष्ट्रमाता जिजाऊंचा विजय असो’, ‘संभाजी महाराज की जय’ च्या जयघोषात ही दुचाकी रॅली काढण्यात आली.