कोल्हापूर : प्रतिनिधी
लाडक्या बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी शिवभोजन थाळी बंद करण्याच्या शासनाच्या हालचाली सुरू आहेत. यासंदर्भात काँग्रेससह अनेक पक्षांच्या नेत्यांनी ही योजना बंद न करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, गरीब मजूर, कामगारांची उपासमार टाळण्यासाठी शासनाने १० रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली. कोरोनाकाळात ही थाळी मोफत दिली जात होती. या थाळीसाठी केंद्रचालकांना देण्यात येणारे ४० रुपयांचे अनुदान महागाईमुळे अपुरे पडत आहे. त्यातच लाडक्या बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडला आहे.
राज्यातील केंद्रचालकांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यांनी ही योजना बंद न करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले असले, तरी यासंदर्भातील निर्णय मार्चमध्ये होणा-या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होणार आहे.
ही योजना बंद केल्यास हा भार कमी होणार आहे; परंतु महाराष्ट्र राज्य शिवभोजन चालक संघटनेचे अध्यक्ष किशोर आयरेकर, उपाध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शिवभोजन चालक मंत्रालयावर एकवटले. ही योजना बंद करू नये, यासाठीचे निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिले. छगन भुजबळ यांच्यासह सर्व पक्षांच्या नेत्यांनीही विनंती केल्याने सरकार ही योजना बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करत आहे.