लातूर : प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि योगदान जनतेला नेहमीच प्रेरणा देत राहो. प्रतिकूल परिस्थितीत ही शत्रूचा बिमोड करून छत्रपती शिवरायांनी गुलामीत असणा-या महाराष्ट्राला मुक्त केले. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यामुळे शिवराय उभ्या जगाचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक युवराज शिंदे यांनी केले.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, मळवटी ता. लातूर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक युवराज शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सय्यद जाकरअली, श्रीकृष्ण पवार, श्रीमती वैभवी पवार, विलास गिरी, चंद्रकांत चोपले, मधुकर गरड, बिटाची भोसले, सुनील आगलावे व विद्यार्थी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची सुरुवात १८७० महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली. त्यामुळे स्वातंर्त्य सैनिक लोकमान्य टिळकांनी जयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली. त्या काळात लोकमान्य टिळक जनतेला सोबत घेऊन ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढा देत होते त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात सार्वजनिक करीत त्या साजरी करण्याचे आव्हान जनतेला केल्याचे सांगून शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा लढा गुलामगिरी विरोधात होता.
बहुजनांचे राज्य आले पाहिजे. दिनदलीत, शेतकरी, मजूर यांना न्याय मिळाला पाहिजे. ही त्यांच्या स्वराज्याची संकल्पना होती. स्वराज्य साकार करण्यासाठी त्यांना शहाजीराजे, राजमाता जिजाऊंचे संस्कार प्रशिक्षण आणि प्रेरणा लाभली होती. संत साहित्यांचा वैज्ञानिक वाद व विवेक वाद हा स्वराज्याचा मूलमंत्र होता म्हणूनच सा-या लढाया शिवरायांनी अमावस्येच्या रात्री केल्या. म्हणून केवळ महाराष्ट्रात भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते असे ते म्हणाले.