सांगली : प्रतिनिधी
राज्यातील लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणुकांचे वेध महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना लागले आहेत. त्यातच, आज आटपाडी येथील एका कार्यक्रमात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी चक्क शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा विशाल पाटलांची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर, आता महाराष्ट्रातील निवडणुका या दिवाळीनंतर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, राज्यात महायुती व महाविकास आघाडीचे नेते आतापासूनच कामाला लागले आहेत.
आता, सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी विशाल पाटील यांनी केलेल्या विधानावरून जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेसमध्ये बंड करून अपक्ष निवडणूक लढवत विशाल पाटील यांनी दिल्ली गाठली. मात्र, विजयानंतर काँग्रेसला आपला पाठिंबाही जाहीर केला. विशाल पाटील यांच्या पाठीशी विश्वजीत कदम यांचा हात होता, असे चित्रही मतदारसंघात पाहायला मिळाले. आता, विधानसभेला विशाल पाटील यांचा हात कोणाच्यामागे याची चर्चा होत आहे.
आटपाडी बाजार समितीत आयोजित कार्यक्रमात खासदार विशाल पाटील बोलत होते. त्यावेळी, त्यांनी केलेल्या रेल्वे आणि राजकीय विधानाची चांगलीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरला जाणारी रेल्वे ही आतापर्यंत दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या आटपाडीमधून जावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील यांनी म्हटले आहे. तसेच, शिवसेना शिंदे गटाचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना विधानसभेसाठी ऑफर देत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे देखील पाटील यांनी स्पष्ट केले.
आटपाडीत बोलताना विशाल पाटील म्हणाले की, आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा खेळ सुरू होईल. या निवडणुकीत लाखोंनी मते सुहास बाबर यांना मिळावीत, ही आमची अपेक्षा आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही शब्द सोडवून आलेलो आहोत. जिथे आमच्यावर प्रेम आहे तेथे आम्ही प्रेम देतो. आम्ही ताकदीने तुमच्या पाठिशी ठाम राहणार आहोत, अशी ग्वाही खासदार पाटील यांनी सुहास बाबर यांना दिली त्यामुळे, शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी विशाल पाटलांचा हात असल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगत आहे.