नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव व धनुष्यबाण हे चिन्ह देण्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी आज (०८ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी अपेक्षित होती. न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी होणार होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी याबाबत माहिती दिली होती. तसेच पक्षचिन्ह प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होईल का? अशी शंका त्यांनी उपस्थित केली होती. अशातच आता शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीला पुढील १२ आणि १३ नोव्हेंबर तारीख मिळाली आहे.
राज्यात होणा-या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव व धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यापासून रोखा, अशी मागणी ठाकरे गटाने जुलैमध्ये अंतरिम अर्जाद्वारे केली होती. या अर्जाची दखल घेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मूळ याचिकाही निकाली काढण्याचे संकेत दिले होते. याआधी या प्रकरणावर २० ऑगस्टला सुनावणी होणार होती.
परंतु, राज्यांच्या विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती व राज्यपालांना वेळमर्यादा असावी का? यावर राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी स्थापन खंडपीठात सूर्यकांत यांचा समावेश झाल्याने ही सुनावणी लांबणीवर पडली होती. यानंतर आज सुनावणी अपेक्षित होती, मात्र आजही शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या सुनावणीसाठी १२ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे.