38.2 C
Latur
Sunday, May 4, 2025
Homeमहाराष्ट्रशिवसेना पक्ष ठाकरेंचा का शिंदेंचा?; ७ मे रोजी होणार सुनावणी

शिवसेना पक्ष ठाकरेंचा का शिंदेंचा?; ७ मे रोजी होणार सुनावणी

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना दिले होते. या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात गेले होते. या प्रकरणी फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती. आता या प्रकरणी कोर्टात बुधवारी (७ मे) सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावर फैसला होणार आहे.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने वेगवेगळे चिन्ह दिले होते. मात्र, पुढे निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला होता.

तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील शिंदेंच्या बाजूने फैसला दिला होता. त्यांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार अपात्र ठरले नव्हते. तसेच विधिमंडळातील शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंकडे राहिला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती पुन्हा सत्तेत आली. शिंदेंचे उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर लढले होते.

निर्णयाकडे लक्ष
बुधवारी होणा-या सुनावणीमध्ये शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. तब्बल दीड वर्षानंतर याबाबत सुनावणी होत असल्याने पुढची तारीख मिळणार की अंतिम फैसला होणार याबाबत उत्सुकता असणार आहे.

निवडणुकीत फैसला झाला…
चिन्ह आणि पक्षाबाबत कोर्टात सुनावणी होत असली तरी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, खरी शिवसेना कोणाची याचा फैसला निवडणुकीत झाला आहे. घरून काम करणा-यांना जनतेने घरीच बसवले आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने पक्ष चालवत आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR