१२ दिवसांपासून बेपत्ता धोडींचा सुरू होता शोध
पालघर : प्रतिनिधी
गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आले. गुजरातमधील भिलाड पोलिस ठाणे अंतर्गत येणा-या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात ४० फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची लाल रंगाची ब्रीझा कार आढळून आली. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच आपल्या साथीदारांना सोबत घेऊन अशोक धोडी यांची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
२० जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना १२ दिवसांनंतर यश आले. मुंबईतून घरी परतत असताना अशोक धोडी यांच्या भावानेच त्यांचे अपहरण करून हत्या केल्याचे आता जवळपास निश्चित झाले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी थेट गुजरात गाठले आणि गुजरातच्या सरिग्राम येथील दगड खाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आणि गाडी थेट ४० फूट खोल पाण्यात ढकलली होती.
पालघर पोलिसांच्या तपासात अशोक धोडींसह त्यांच्या गाडीचा शोध घेण्यात यश आले. तब्बल ७ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पालघर पोलिसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह गाडीसह बाहेर काढला. अशोक धोडी यांचा लहान भाऊ अविनाश धोडी याने साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याचे समोर आले आहे.
चार आरोपी अटकेत
धोडींच्या हत्या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अविनाश धोडी याच्यासह आणखी तीन आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींचा पालघर पोलिस सध्या शोध घेत आहेत.