परभणी : शहरातील रस्ते बांधकामावरील स्थगिती तात्काळ उठवावी व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशी मागणी करत आ. डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि.१० येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कुलुप ठोकण्यात आले.
परभणी शहरातील सर्व रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या प्रश्नावर मनपा, जिल्हाधिकारी, राज्य शासन यांना वारंवार निवेदने देण्यासह मोर्चे, आंदोलने करण्यात आली आहेत. आ. डॉ. पाटील यांनी विधानसभेत वारंवार रस्ते बांधकामावरील स्थगिती उठवावी अशी मागणी केलेली आहे. परंतू निष्क्रीय राज्य शासनाने गेल्या दोन वर्षापासून परभणीकरांच्या या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.
मनपा हद्दीतील १७.५ किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले होते. या रस्ते कामासाठी मागील शासनाने ८२ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजनही झाले होते. परंतू सरकार बदलल्यानंतर संबंधित ८२ कोटींच्या रस्ते कामांना स्थगिती देण्यात आली. त्यानंतर आ.डॉ.पाटील यांनी वेळोवेळी हा प्रश्न विधानसभेत मांडून रस्ते बांधकामावरील स्थगीती उठवण्याची मागणी केली होती. तसेच उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपिठात याचीका दाखल केली होती. त्यावर मा.न्यायालयाने या रस्त्यांसाठी आलेला निधी इतरत्र न खर्च करता राखीव ठेवण्यात यावा असे आदेश दिले होते. परंतू दुर्देवाने राज्य शासनाने रस्ते कामासंदर्भात निर्णय घेतला नाही.
शहरातील जेल कॉर्नर ते अपना कॉर्नर, मोठा मारोती ते उघडा महादेव या दोन मार्गासह अन्य प्रमुख रस्त्यांचा प्रश्न कायम राहील्याने नागरीकात संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे परभणी विधानसभा मतदार संघाचे आ. डॉ. पाटील यांनी आज बुधवारी आक्रमक पवित्रा घेत शिवसैनिकांसह सार्वजनिक बांधकाम विभागात दाखल होत कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलुप ठोकले. यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, तालुका प्रमुख नंदू पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख अर्जुन सामाले, कृउबा सदस्य अरविंद देशमुख, युवासेना तालुका प्रमुख संदीप झाडे, दलित आघाडी तालुका प्रमुख सुभाष जोंधळे, शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार, माजी शहर प्रमुख अनिल डहाळे, युवा सेना शहर प्रमुख बाळराजे तळेकर, विशु डहाळे, अमोल गायकवाड, दिनेश बोबडे, गजानन देशमुख, प्रशास ठाकूर, सुशील कांबळे, महिला विधानसभा संघटक अंबिका डहाळे, शहर संघटक वंदना कदम आदीसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.