22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रशिव्याशाप देऊ नका

शिव्याशाप देऊ नका

प्रचार सुरू करण्यापूर्वी पदाधिका-यांना एकनाथ शिंदेंच्या सूचना

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ज्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून पदाधिकारी, नेतेमंडळी आणि प्रवक्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (ता. २१ मार्च) वरळी डोम येथे पदाधिकारी, प्रवक्ते आणि पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उपस्थित असलेल्या पदाधिका-यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. विरोधकांवर टीका करा, पण टीका करताना खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका, अशी सूचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला पक्षातील प्रवक्ते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एका ठिकाणच्या आरोप- प्रत्यारोपांचे पडसाद सर्वत्र उमटतात. पक्षाची जी भूमिका आहे त्याच्या विरोधात कुणालाही जाता येणार नाही. आपण मराठा आरक्षण दिले आहे. कोर्टात टिकणारे आरक्षण आहे. पोलिस भरती या आरक्षणानुसार होत आहे. मराठा समाजाला न्याय दिला. ओबीसींवर अन्याय केला नाही. ही सर्व कामे लोकांपर्यंत पोहोचवा.

तसेच, विरोधक खालच्या पातळीवर टीका करत आहेत. पण आपण आपली पातळी सोडायची नाही. शिव्याशाप द्यायचे नाहीत. विरोधकांना एक्स्पोज करा. हिंदुत्व सोडले, बाळासाहेबांचे विचार सोडले. शिवाजी पार्कला हिंदू बांधव-भगिनी म्हणायची त्यांना लाज वाटली. २०१९ सालापासून ते बाळासाहेबांच्या इच्छेविरुध्द वागत आहेत, हे सांगा. पण तुम्ही खालच्या पातळीवर विरोधकांवर टीका करू नका. त्यांचा खरा चेहरा समोर आणा, सरकारने केलेली कामे मुद्देसूद मांडा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.

त्याशिवाय, निवडणुकीकरिता मध्यवर्ती कार्यालयात २४ तास कार्यरत राहणे, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कार्यालय कार्यान्वित करून कामाला सुरुवात करणे, विधानसभानिहाय बैठका घेणे, शाखा-शाखांशी संपर्क ठेवावा, महायुतीच्या स्थानिक नेतृत्वाशी संपर्क व समन्वयक ठेवावा. त्यांच्या बैठका घ्याव्यात. संयुक्त मेळावे घ्यावेत, संयुक्त प्रचार करावा, चौक सभा, संयुक्तपणे घरोघरी प्रचार करणे, यांसारख्या सूचना लोकसभा निरीक्षकांना करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक वोटिंग स्लिप वाटण्यात याव्या. मोठ्या सभा, रॅली यासाठी समन्वयाने काम करावे. प्रचार साहित्यावर प्रोटोकॉलनुसार स्थानिक पदाधिका-यांची नावे, फोटो याचा वापर करावा. प्रचार आणि सभांच्या संपूर्ण नियोजनावर लक्ष ठेवावे. महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स, पोस्टर, होर्डिंग यासाठी परवानगी घेऊनच लावावे. स्थानिक पातळीवर मते वाढवण्यासाठी विविध जाती-धर्म सामाजिक संघटना यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवावा. समोरच्या गटातील नाराज पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, पक्ष प्रवेश अथवा वोटिंगसाठी त्याची मदत घ्यावी. स्थानिक पक्षांतर्गत आणि महायुती अंतर्गत वाद कृपया ताबडतोब मिटवावे. आचारसंहितेचा भंग होता कामा नये आणि जर कोणी भंग करत असेल तर त्याचा रिपोर्ट मध्यवर्ती कार्यालयात द्यावा, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR