लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात हिवाळयाची चाहूल गेल्या २० ते २५ दिवसापूर्वीच झाली होती. परतीच्या पावसानंतर जिल्हयात थंडीचा परिणाम हळू-हळू वाढताना दिसत आहे. उत्तर भारतातून थंड हवा वाहत असल्याने सध्या थंडीची चाहूल अधिक जाणवत आहे. त्यामुळे सकाळी १३ अंश सेल्सीअस पर्यंत तापमान घसरत आहे. त्यामुळे माणसाला थंडीची चाहूल लागताच उबदार कपडे खरेदी करण्याकडे आपली पाऊले वळतात. तसेच मुक्या प्राण्यांवरही थंडीचा परिणाम होतो. म्हणून त्यांचे आरोग्य सांभाळण्याच्या संदर्भाने पशुसंवर्धन विभागाने कांही सुचना पशुपालकांना केल्या आहेत. हिवाळयातील शीतलहरींमुळे पशुधनावर अनेक प्रकारचे शारीरिक, मानसिक आणि उत्पादनासंबंधी दुष्परिणाम होतात. तापमान अत्यंत कमी झाल्यास आणि योग्य काळजी न घेतल्यास हे दुष्परिणाम अधिक तीव्र होऊ शकतात.
शीतलहरींमुळे पशुधनावर शारीरिक दुष्परिणाम होतात. हायपोथर्मिया म्हणजेच शरीराचे तापमान अत्यंत कमी होऊन जनावरांमध्ये सुस्ती, कंप, आणि गंभीर अवस्थेत शॉक येण्याची शक्यता असते. जनावरांच्या शरीराच्या बा भागांवर त्वचेला काळसर डाग पडणे, जखमा होणे, आणि गंगरीनसारख्या समस्या होऊ शकतात. थंड हवेचा सतत संपर्क आल्यास जनावरांना न्यूमोनिया, खोकला, श्वास घेण्यास अडचण होऊ शकते. थंड हवामानामुळे भूक कमी होऊन उर्जा तुटवडा निर्माण होतो, ज्यामुळे जनावरांचे आरोग्य खालावते. हिवाळयातील तीव्र थंडी आणि शीतलहरींमुळे पशुधनावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तापमान ४ अंश सेल्सियसच्या खाली गेल्यावर पशुधनाच्या आरोग्यावर परिणाम होतो, ज्यामुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेत घट होण्याची शक्यता असते. यासाठी पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. शीतलहरींमध्ये पशुधनाची काळजी कशी घ्याल? या संदर्भाने पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांसाठी काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.