15.8 C
Latur
Friday, November 21, 2025
Homeक्रीडाशुभमन गिलने मोडला रोहित शर्माचा विक्रम

शुभमन गिलने मोडला रोहित शर्माचा विक्रम

मुंबई : वृत्तसंस्था
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीत अरुण जेटली स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. कर्णधार शुभमन गिल याने सुरेख फटकेबाजीने सगळ्यांनाच मोहित केले. पहिल्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावणा-या गिलने यावेळी शतकी खेळी केली. कर्णधारपदाला साजेशी खेळी करणा-या गिलने रोहित शर्माचा विक्रमही मोडीत काढला. रोहितला मागे टाकत आता त्याने भारताच्या महान फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

शुभमन गिल याने या डावात १७७ चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले. कसोटी कारकीर्दीतील त्याचे हे दहावे शतक आहे. विशेष म्हणजे त्याने ही सर्व शतके वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये झळकावली. डब्ल्यूटीसीच्या इतिहासात गिल भारताकडून खेळताना सर्वाधिक शतके करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दहा शतके झाली आहेत. त्याने भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला मागे टाकले आहे. त्याच्या नावावर नऊ शतके आहेत.

रोहित शर्मा आता या यादीत दुस-या स्थानी आहे. गिलनंतर तिस-या स्थानी भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आहे. त्याने आतापर्यंत ७ शतके झळकावली आहेत. के. एल. राहुल आणि ऋषभ पंत यांनी प्रत्येकी ६ शतके ठोकली आहेत. तर रवींद्र जडेजा आणि विराट कोहली यांच्या नावावर प्रत्येकी ५ शतके आहेत.

कर्णधारपदी वर्णी लागताच बॅट तळपली
शुभमन गिल याने इंग्लंड दौ-यापासून भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. कर्णधार होताच त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. कसोटी कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळताना सात सामन्यांत त्याने पाच शतके झळकावली आहेत. त्यातील चार शतके ही इंग्लंड दौ-यात तडकावली आहेत.
आता वेस्ट इंडिजच्या विरोधातही त्याने हा कारनामा सुरूच ठेवला आहे. गिलने भारतीय कर्णधार म्हणून एका वर्षात सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत विराट कोहलीची बरोबरी केली आहे. विराटनेही एका वर्षात कर्णधार म्हणून पाच शतके केली होती. त्याने हा कारनामा दोनदा केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR