लातूर : प्रतिनिधी
रेल्वे प्रशासनाने हरंगुळ (लातूर) – पुणे गाडीला सुरुवातीला ‘शून्य’ क्रमांक देऊन विशेष रेल्वेचा दर्जा दिला आहे. यामुळे रेल्वेने उत्पन्नात वाढ होत असली तरी याचा फटका लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला बसत आहे. हा रेल्वेचा ‘शून्य’चा खेळ लातूरच्या प्रवाशांना महाग पडत असून या गाडीचा विशेष दर्जा काढून सामान्य तिकीट दराने ती चालविण्याची आवश्यकता आहे. तशी मागणी ही प्रवाशांतून केली जात आहे.दरम्यान, ऑक्टोबर २०२३ पासून हरंगुळ (लातूर)-पुणे विशेष रेल्वे सुरू केली. या गाडीस अनेक महिन्यांपासून विशेष दर्जा व जादा तिकीट दराने चालविली जात आहे. यामुळे लातूर व या मार्गावरील प्रवाशांना सामान्य तिकीट दरापेक्षा ३० ते ११४ टक्क्यांपर्यंत अधिकचे तिकीट दर असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या या रेल्वेगाडीला जादा तिकीट भरून प्रवास करावा लागत आहे.
हरंगुळ (लातूर) पुणे एक्स्प्रेस कायम तसेच तिकीट दर सामान्य केल्यास लातूर, धाराशिव, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील प्रवाशांचा प्रवास गर्दीमुक्त होण्यास मदत होणार आहे. हरंगुळ (लातूर)-पुणे विशेष रेल्वेगाडीला सामान्य दर्जा देणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाने या गाडीचा विशेष दर्जा काढल्यास तिकीट दर रुपयांमध्ये स्लीपर ३१० ऐवजी १४५, एसी ३ टियर ८५० ऐवजी ५०५, एसी २ टियर ११४५ ऐवजी ७१०, फर्स्ट क्लास – १५१० ऐवजी ११७५ असा होईल व प्रवाशांच्या खिशाला बसणारी अर्थिक झळ कमी होईल.