लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रमाता जिजाऊ राजे जाधव यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा येथे जिजाऊ जयंती निमित्त येणा-या समाज बांधवांची गर्दी मोठी असते यावर्षी ४२७ व्या जयंतीनिमित्त लाखो समाज बांधवांनी बारा जानेवारीला मातृ तीर्थ सिंदखेडराजा येथे हजेरी लावली होती. यावेळी या ठिकाणी शेकडो क्विंटल कचरा निर्माण झाला होता. या कच-याची पीएच. डी. संशोधकांच्या मदतीने विल्हेवाट लावण्यात आली.
हा उपक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आणि श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात पीएचडी करणा-या हजारो विद्यार्थ्यानी सिंदखेडराजा येथील मातृतीर्थावरील कचरा अवघ्या दोन तासात उचलून परिसर स्वच्छ केला आहे. यात लातूरच्या संशोधक विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता. सिंदखेड राजा नगरपरिषदेच्या साह्याने या कच-याची विल्हेवाट लावण्यात आली.
राज्यभरातून आलेल्या पी.एच.डी संशोधक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून या मोहिमेला सुरुवात केली होती. अवघ्या दोन तासात येथील कचरा जमा करून नगरपरिषदेच्या साह्याने त्याची विल्हेवाट लावण्यात आली. सारथी चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, श्रीकांत देशमुख, सिंदखेड राजाचे तहसीलदार यांनी भेट दिली.
यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित लातूर मधील दयानंद कला महाविद्यालय , दयानंद विज्ञान महाविद्यालय, शाहू महाविद्यालय, बसवेश्वर महाविद्यालय येथील वेगवेगळ्या विषयात पी.एच.डी करणारे विद्यार्थी सागर गणपत यादव , महेशकुमार जाधव, पवन भोसले, साहेबराव पवार, जगन्नाथ कदम, प्रमोद बचिफले,विजय झाडके, नरसिंग शिंदे, प्रिया सूरवसे, कल्पना जगताप यांच्यासह शेकडो संशोधक विद्याथ्यांची उपस्थिती होती.