31.6 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeमहाराष्ट्रशेतकरी कर्जमाफीवर राजू शेट्टी आक्रमक

शेतकरी कर्जमाफीवर राजू शेट्टी आक्रमक

सांगली : प्रतिनिधी
राज्यात पुन्हा एकदा शेतक-यांच्या कर्जमाफीचा मुद्दा तापला आहे, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आहे. महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाले. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीन पक्षांचे राज्यात तब्बल २३२ उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीला केवळ ५० जागांवरच समाधान मानावं लागलं.

दरम्यान राज्यात आता महायुतीचे सरकार आले आहे, शेतक-यांच्या नजरा कर्जमाफीकडे लागल्या आहेत. मात्र अजूनही त्याबाबत कोणतीच हालचाल होताना दिसत नाही, दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून सातत्याने सुरू असलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे शेतक-यांमध्ये कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण झाला आहे.

याविरोधात आता प्रहार जनशक्ती पक्षाने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. बच्चू कडू यांच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. दरम्यान बच्चू कडू यांच्या या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहे.

स्वाभिमानीचाही असाच निर्णय झालेला आहे, महायुतीने निवडणुकीच्या काळात सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. हमीभावाच्या २० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती, या दोन्ही घोषणा हवेत विरल्या आहेत. शेतकरी आक्रमक झालेला आहे.आणि सध्या आमचीही जनजागृती सुरू आहे. प्रहारने जसे सत्ताधा-यांच्या घरी जाऊन आंदोलन केले तसे आम्ही महायुतीच्या मंत्र्यांना कार्यक्रमात जाऊन जाब विचारणार आहोत, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी सरकारला दिला आहे.

सरकारने शेतक-यांना गंडवले
तुमची औकात नव्हती, तुम्हाला जमत नव्हतं, तर आश्वासन का दिलं? असा सवाल यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, अजित पवार सांगतात आम्ही आता सातबारा कोरा करू शकत नाही, राज्याची तशी स्थिती नाही. मग महायुतीने खोटे आश्वासन का दिले, शेतक-यांना का गंडवले? राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे तर, शक्तिपीठ सारखे खर्चिक प्रकल्प महाराष्ट्रावर का लादत आहात? त्यामुळे यापुढे महायुतीच्या नेत्यांना राज्यात फिरणे मुश्किल करू, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR