24.6 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeमुख्य बातम्याशेतकरी-पोलिसांत झटापट; पंजाबात ७ आंदोलक जखमी

शेतकरी-पोलिसांत झटापट; पंजाबात ७ आंदोलक जखमी

गुरूदासपूर : वृत्तसंस्था
पंजाबमधील गुरदासपूर येथे आज (दि. ११) शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या जोरदार झटापटीमध्ये ७ जण जखमी झाले आहेत. एक्स्प्रेस वे साठी आमच्या जमिनींचा जबरदस्तीने ताबा घेतला जात आहे, तसेच या जमिनीचा योग्य मोबदला दिला जात नाही, असा आरोप शेतक-यांनी केला आहे. शेत जमिनीच्या अधिग्रहणासाठी आधी नोटिसही बजावण्यात आलेली नाही, असा आरोपही शेतक-यांकडून करण्यात येत आहे.

आंदोलक शेतक-यांनी घडलेल्या घटनेबाबत सांगितले की, दिल्ली-कटरा एक्स्प्रेस महामार्गासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यावरून वाद सुरू आहे. गुरदासपूरमध्ये जमिनीचा ताबा घेण्यावरून शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता आमची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तसेच जमिनीचा योग्य मोबदलाही देण्याचे नाकारले, असा आरोप आंदोलक शेतक-यांनी केला आहे. दरम्यान, याविरोधात आंदोलन सुरू राहील, असा इशाराही शेतक-यांनी दिला आहे.

याआधी ५ मार्च रोजी चंदीगडमध्ये आंदोलनावरून शेतकरी आणि पोलीस आमने सामने आले होते. शेतकरी संघटनांनी भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आंदोलन केले होते. तसेच सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ५ मार्चपासून एक आठवडाभर आंदोलन करण्याचे नियोजन होते. तसेच संपूर्ण पंजाबमधून येथे शेतकरी येणार होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी आंदोलक शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतले. तसेच आंदोलक शेतक-यांना वाटेतच अडवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR