महात्मा फुलेंच्या वेशात जाऊन लगावले आसुडाचे फटकारे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील शेतक-यांना योग्य हमीभाव न मिळाल्याने मोठे नुकसान झाले. सोयाबीनचे उत्पादन घेणा-या शेतक-यांना तर यंदा मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले. राज्यातील विधिमंडळात अनेकवेळा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आता हाच मुद्दा थेट संसदेत उपस्थित झाला. राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी सोयाबीन, टोमॅटो तसेच अन्य पिकांना मिळणारा भाव, शेतक-यांचे होणारे आर्थिक नुकसान आणि केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, याला केंद्रस्थानी ठेवून संसदेत जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांची पगडी घालून शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्यांनी माझ्या नारायणराव येथील शेतक-यांना आज ४-५ रुपये किलो दराने टोमॅटो विकावा लागतो. हाच टोमॅटो शहरी भागात २०-२५ रुपये किलो दराने विकला जातो, याचे कारण दलालांची साखळी. सरकारने या संदर्भातही विचार करण्याची गरज आहे.
अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक शेतकरी हेक्टरी ३० क्विंटल उत्पादन घेतात तर भारतात केवळ १०क्विंटल उत्पादन होते. कारण अमेरिकेतील शेतक-यांना जेएम व्हरायटी बियाणे वापरण्याचा अधिकार आहे, जो भारतातील शेतक-यांना नाही. विशेष म्हणजे सरकार आयात करीत असलेले खाद्यतेल ते जेएम व्हरायटीचे असले तरी चालते, पण शेतकरी जेएम व्हरायटी बियाणे वापरु शकत नाहीत. थोडक्यात जिथे अमेरिका आपल्या शेतक-यांना सक्षम करतेय तिथे भारतीय शेतकरी मात्र हमीभावासाठी झुंजत आहेत, असे म्हणत अमेरिका आणि भारतातील शेती धोरणाच्या विसंगतीकडे खासदार डॉ. कोल्हे यांनी लक्ष वेधले.
खोलीकरण करा, नद्यांचा उत्सव होईल
महाकुंभ संदर्भात पंतप्रधानांनी नदी का उत्सव मनाना चाहिए असे म्हटले. परंतु जेव्हा नदीचे खोलीकरण, रुंदीकरण आणि पुनरुज्जीवन होईल, तेव्हाच खरा नदीचा उत्सव होईल, असे खासदार डॉ. कोल्हे म्हणाले. महाराष्ट्रातील कैलास नागरे या प्रगतीशील युवा शेतक-याने शेतीला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली, हा आपल्या धोरणांवर एक प्रकारचा तमाचा नाही का, असा जळजळीत सवाल त्यांनी केला.
आंतरराष्ट्रीय बाजारात
स्पर्धेची मोकळीक द्या
देशातील शेतक-यांना पुरेसे पाणी, उत्तम दर्जाचे बियाणे आणि शेतमालाला योग्य भाव द्यावा. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा करण्याची मोकळीक द्यावी, म्हणजे त्याला सरकारच्या प्रतीदिन १७ रुपयांच्या सन्मानाची आवश्यकता भासणार नाही, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली.