कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता राज्य सरकारने तातडीने करावी. दिलेला शब्द पूर्ण करावा. शेतक-यांचा सातबारा कोरा करून द्यावा, त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १ जानेवारी रोजी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.
राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिका-यांची पुणे येथे २५ डिसेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीत शेतक-यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मागील पाच वर्षांत केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी रसातळाला गेला आहे. त्यातच सोयाबीन, कापूस, तूर, दूध, साखर, डाळी, आदींच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी मातीमोल झालेला आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतक-यांना आपला शेतीमाल विकावा लागत आहे. रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झालेली आहे.
डी.ए.पी.मध्ये पुन्हा २५० रुपयांची वाढ झालेली आहे. कीटकनाशके, तणनाशकांच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. सरकार हमीभाव जाहीर करते; पण हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतक-यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकावा लागत आहे.
परिणामी गेल्या पाच वर्षांत शेतक-यांचे कर्ज हे दुप्पट झाले आहे. एका बाजूला केंद्र सरकार देशातील कॉर्पोरट कंपन्यांच्या १० लाख कोटींच्या कर्जाचा निर्णय घेत नाही. ते कर्ज राईट ऑफ करत आहे. दुस-या बाजूला शेतक-यांचे कर्ज दुप्पट होते. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. महायुती सरकारला शेतक-यांनी भरभरून मते दिलेली आहेत.
राज्यात रामराज्य आले असल्याचे महायुतीचे नेते सांगत आहेत. राज्य सरकारने आपला दिलेला शब्द पाळावा, म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी १ जानेवारीला जाऊन सरकारने दिलेल्या शब्दांची आठवण करून देतील. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मी स्वत: याबाबत आठवण करून देणार आहे. त्यानंतरही सरकारने आमची दखल घेतली नाही तर राज्यव्यापी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.