18.8 C
Latur
Tuesday, February 3, 2026
Homeलातूरशेतक-यांची फसवणूक करणा-या भाजपला धडा शिकवा

शेतक-यांची फसवणूक करणा-या भाजपला धडा शिकवा

चाकूर तालुक्यातील जानवळ येथील सभेत माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांचे आवाहन 
चाकूर : प्रतिनिधी 
सरकारने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीची आश्वासने दिली. पण अद्याप कर्जमाफी मिळलेली नाही. शेतक-यांना कर्जमाफी देणारे सहकार मंत्री आपल्या जिल्ह्यातील व याच तालुक्यातील आहेत. मग ते शेतक-यांची कर्जमाफी का करीत नाहीत, याचा जाब आपण त्यांना विचारायाला हवा. हेच प्रकार भाजप सरकारच्या काळात नेहमी होत आहेत.  शेतक-यांना फसवणे, शिवीगाळ करणे, शेतक-यांची थट्टा करणे, शेतक-यांच्या सोयाबीनला हमीभाव नाही असे एक ना अनेक प्रकार या सरकारच्या काळात होत असून शेतक-यांनी आपल्या मनगटात किती ताकद आहे, हे दाखविण्याची आता वेळ आली आहे. या निवडणुकीत त्यांना धडा शिकवला पाहिजे, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने  दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चाकूर तालुक्यातील जानवळ येथील हनुमान मंदिरासमोर काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जानवळ येथील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
 लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जानवळ जिल्हा परिषद गटातील नागनाथ रामराव पाटील, पंचायत समिती गणातील सौ. प्रतिभा गणपत सूर्यवंशी आणि झरी (बु) पंचायत समिती गणातील सौ. अमृता जळबा खंदारे या काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन केले गेले होते. यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, आज आपण जानवळ या ठिकाणी आयोजित विराट सभेसाठी एकत्र आलेलो आहोत. या सभेतील गर्दी व आपला उत्साह पाहून ही प्रचाराची सभा आहे की विजयाची असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. बाभळगाव येथून निघाल्यापासून इथे येईपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर होतो, तोवर ठीक होते. पण आत वळल्यास येथील खड्डेयुक्त रस्ते आणि धुळीत शोधावा लागणारा रस्ता पाहिल्यानंतर या मतदारसंघातील मंत्री असताना आणि राज्य व केंद्रात पाशवी बहुमत असलेले सरकार असताना एवढी बिकट अवस्था आहे. याला काय म्हणणार?
महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात आम्ही कोविड महामारीपासून आपला बचाव कसा करायचा यात होतो आणि हे भाजपचे नेतेलोक पक्ष फोडाफोडी कारण्यात व्यस्त होते. आम्ही आमची जबाबदारी, आमची बांधिलकी जपली. यापुढेही जपत राहू. आमच्या जबाबदारीतून एक इंचही मागे हटणार नाही. आपल्या गावातील अनेकांना घरांचे कबाले अद्याप मिळालेले नाहीत, ते मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चित येणा-या काळात पुरेपूर प्रयत्न करू, असा शब्द त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला.
शासनाच्या वतीने अंतेश्वर ते झरी उपसा सिंचन अंतर्गत सर्वेक्षण करून सदर तलाव रामवाडी शिवारात करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी असताना शासन शेतक-यांचा ग्रामस्थांचा विरोध पत्करून सदर प्रकल्प करण्यावर ठाम आहे. पण हा प्रकल्प ग्रामस्थांना नको असेल तर आम्ही सरकारच्या विरोधात गावक-यांच्या खांद्याला खांदा लावून सरकार विरोधात उभे राहू, अशा शब्दात ग्रामस्थांना आश्वस्त केले.
दरम्यान या जाहीर प्रचार सभेत मोहन माने, गणपतराव सूर्यवंशी, एन. आर. पाटील, विलासराव पाटील चाकूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत काँग्रेस आघाडीच्या सर्व उमेदवाराना बहुमताने विजयी करून लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये पाठवावे आणि आपल्या सेवेची संधी द्यावी, अशी विनंती केली. यावेळी चंद्रकांत मुद्दे, अ‍ॅड. समद पटेल, निलेश देशमुख, युनूस मोमीन, सचिन बंडापल्ले, संजय पवार, बालाजी मुस्कावाड, पिंटू पाटील, लाला शिंदे, प्रताप शिंदे, रियाज पठाण यांच्यासह जानवळ जिल्हा परिषद गट व गण यासह झरी बु. पंचायत समिती गणातील मतदार बंधू भगिनी, काँग्रेस आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला भगिनी व  परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गलथान कारभाराला जनता कंटाळली
सामान्य माणसे भाजपच्या गलथान कारभार, भ्रष्टाचाराला कंटाळलेले असून मतदारांनी लातूर महानगरपालिका निवडणुकीत आपला रोष मताच्या रुपात व्यक्त करून लातूर मनपावर काँग्रेस पक्षाचा तिरंगा फडकवला. अगदी तसाच रोष या लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत व्यक्त करीत आमच्या उमेदवारांना स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी प्रचंड मतांनी विजयी करून पाठवावे. जेणेकरून आपणास लोकाभिमुख प्रशासन आणि भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक कारभार करून लातूर जिल्हा परिषदेला गतवैभव प्राप्त करून देता येईल, असे आमदार अमित देशमुख म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR