शंभू : वृत्तसंस्था
वर्षभरापासून शंभू आणि खनौरी बॉर्डरवर तळ ठोकून असलेल्या शेतक-यांचे आंदोलन उधळून लावण्यात आले आहे. पंजाब पोलिसांनी रात्री अचानक कारवाई करत आंदोलन स्थळावर उभारण्यात आलेल्या तंबूंसह इतर साहित्यावर बुलडोझर चालवला. तसेच जवळपास १३ महिन्यांनंतर शंभू बॉर्डर खुली करण्यात आली आहे.
दरम्यान, शेतकरी आंदोलनावर कारवाई करण्यामागे पंजाब सरकार आणि आम आदमी पक्षाने विचारपूर्वक आखलेली रणनीती असल्याचे बोलले जात आहे. तसेच या कारवाईमागची काही प्रमुख कारणंही समोर येत आहेत.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मागच्या आठवड्यात पंजाबचा दौरा केला होता. त्यावेळी ते लुधियानामध्येही गेले होते. त्यावेळी शंभू आणि खनौरी बॉर्डरवर शेतक-यांचे आंदोलन सुरू राहिले तर आगामी पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाला मते मिळणार नाहीत, असे लुधियानामधील उद्योगपतींनी केजरीवाल यांना सांगितले होते.
शेतक-यांच्या आंदोलनामुळे व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे उद्योगपतींनी यावेळी सांगितले. पंजाबच्या दोन्ही सीमांवर वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करत असल्याने व्यापार आणि ट्रकची वाहतूक विस्कळीत होत असल्याची तक्रारही या व्यापा-यांनी केजरीवाल यांच्याकडे केली होती.
अशा परिस्थितीत पंजाबमधील आम आदमी सरकारने विचारपूर्वक रणनीती आखून शेतकरी आंदोलकांवर कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी दोन्ही सीमांवर आंदोलक शेतक-यांवर पाण्याचे फवारे मारण्यात आले होते. तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.