22.9 C
Latur
Thursday, October 2, 2025
Homeलातूरशेतक-यांसाठी सरकारशी दोन हात करु

शेतक-यांसाठी सरकारशी दोन हात करु

लातूर : प्रतिनिधी
अतिवृष्टीने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. मात्र सरकार गप्प आहे. अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना मदतीसाठी सरकार काही करताना दिसत नाही. सरकार उदासीन आहे. परंतू, शेतक-यांना मदत मिळेपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. वेळ प्रसंगी सरकारशी दोन हात करु, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
यंदा अतिवृष्टी झाली. शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे बाभळगावचा दसरा महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळूंके, काँगे्रसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. समद पटेल, कल्याण पाटील, सरपंच प्रिया सचिन मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख,्र तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव देशमुख, शाम देशमुख, महादेव मुळे, विजय देशमुख, संतोष देशमुख, सर्जेराव मोरे, गणपतराव बाजुळगे, व्यंकटेश पुरी, प्रताप पाटील, सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाभळगावचा दसरा महोत्सव देशातील असा एकमेव असेल जिथे सर्वच जाती, धर्माचे लोक एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात, असे नमुद करुन आमदार अमित देशमुख म्हणाले, बाभळगावच्या मातीचा गुण विलक्षण आहे. दगडोजीराव देशमुख (दादासाहेब) यांची बाभळगावचा दसरा महोत्सव सुरु केला. पुढे विकासरत्न विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दसरा महोत्सवाची परंपरा कायम ठेवली. ती आजही सुरुच आहे. गावचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न होतो आहे. विकास कामांमुळेच बाभळगाव ग्रामपंचायतीने विविध पारितोषीके मिळवली आहेत. गावात मुलींसाठी अभ्यासिका असावी, असा आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात अतिवृष्टीने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टर सोयाबीन पाण्यााखाली आहे. नुकसानीचा आकडा ५ हजार कोटीपेक्षा अधिक आहे. खरीप गेले, रबीचे सांगता येत नाही, शेतकरी अडचणीत आहेत आणि सरकार बोलत नाही. उलट पैशाचे सोंग करता येत नाही, असे उर्मटपणे सांगीतले जाते. शक्तीपीठ महामार्गासाठी ८७ हजार कोटी, समृद्धी महामार्गासाठी दीड लाख कोटी, नवी मुंबई, पुणे विमानतळ, पुणे रिंगरोड, बुलेट ट्रेनसाठी सरकारकडे पैसा आहे. परंतू, अडचणीतील शेतक-यांना मदत करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. शेतक-यांना जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहील, असेही आमदार अमित देशमुख म्हणाले.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लातूर महानगरपालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुर्ण ताकदीने लढून या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसची सत्ता आणू असा निर्धारही आमदार अमित देशमुख यांनी यावेळी बोलून दाखवला. यावेळी अभय साळूंके, अ‍ॅड. किरण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले तर सरपंच प्रिया मस्के यांनी प्रास्ताविक केले. शेवटी माजी उपसरपंच अविनाश देशमुख यांनी आभार मानले. यावेळी सुभाष घोडके, प्रविण पाटील, अविनाश बट्टेवार, अब्दूल्ला शेख, नबी नळेगावकर, करीम तांबोळी, युनूस मोमीन, सुंदर पाटील कव्हेकर, यूसूफ बाटलवाला, बादल शेख, मोहन सुरवसे, सतीश हलवाई, शरद देशमुख, प्रविण सूर्यवंशी, रामदास पवार, विकास कांबळे, गोपाळ तापडे, राजेश गुंठे, अन्वरभाई, महादेव जटाळ यांच्यासह बाभळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी बाभळगाव्या गढीवरुन मिरवणुक गावातील महादेव मंदीर, आईचे मंदीर, मारुती मंदीर, मलंगशाहवली दर्गा, मेसुबाईचे मंदीर, देवीची आरती करुन दसरा महोत्सव झाला. दसरा महोत्सवाचा समारोप विलास बागेतील विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणास्थळाचे दर्शन घेवून करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR