अतिवृष्टीची भरपाई मिळेना, शेतक-यांच्या संतापाचा उद्रेक
नांदेड : प्रतिनिधी
गत दोन महिन्यापूर्वी शहर तथा जिल्हाभरात अतिवृष्टी झाल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतक-यांचे होत्याचे नव्हते झाले. त्याची नुकसान भरपाई अद्याप शेतक-यांना मिळाली नसल्याने त्यांची दिवाळी अंधारात गेली. या संतापाचा उदे्रक झाल्याने एका शेतक-याने २७ ऑक्टोबर रोजी मुदखेड तहसील कार्यालयात तहसीलदार आनंद देऊळगावकर यांची शासकीय गाडी फोडल्याची घटना समोर आली आहे.
पावसाळ््याच्या शेवटी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांमध्ये शहर तथा जिल्ह्यात अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पाऊस झाला. परिणामी शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. भाजप शासनाने शेतक-यांना दिवाळीपर्यंत अतिवृष्टी व पूरग्रस्तांना अनुदानाची रक्कम देण्याचे जाहीर केले होते. त्यावर कहर म्हणजे तटपुंजे अनुदान काही शेतक-यांना मिळाले. त्यामुळे आधीच पीडित असलेल्या शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले. दरम्यान, मुदखेड तालुक्यातील वासरी येथील शेतकरी साईनाथ मारुती खानसोळे यांना अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात गेली. याचा राग मनात धरून या संतप्त शेतक-्याने जय जवान, जय किसानच्या घोषणा देत २७ ऑक्टोबर रोजी तहसीलदार आनंद देऊळगावकर यांची शासकीय गाडीची तोडफोड करून आपला प्रशासनावरील रोष व्यक्त केला.
दरम्यान नांदेड जिल्ह्यात माहे जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेषत: माहे ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पूर झाल्याने जीवित व वित्तहानी झाली होती. अशा बाधितांना वेळोवेळी तातडीने जिल्हा प्रशासनातर्फे मदत देण्यात आली आहे. संबधित शेतकरी साईनाथ मारोती खानसोळे मौ.वासरी ता. मुदखेड यांना मौ.वासरी गावातील गट क्र.३७१ व ३८२ मधील पिक नुकसानीचे अनुदान रुपये ६ हजार २९० रुपये त्यांच्या बँक खात्यात ८ ऑक्टोबर रोजी जमा झाले, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

