माढा-माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी येथे शेतजमीनीच्या वादातून कांतीलाल ज्ञानदेव माने (वय ५२) या इसमाचा सत्तुर व काठीने मारहाण करून खून केला असल्याची घटना घडली असून याबाबत . एका संशयीत आरोपी भिवा संपत्ती बुद्रुक याच्यावर माढा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची फिर्याद मयताची पत्नी अनुराधा कांतीलाल माने (वय ३२) यांनी माढा पोलिस ठाण्यात दिली . त्यानुसार मयत कांतीलाल माने हे संदिप भूजंगराव पाटील यांची शेती करून आपला उदरनिर्वाह करीत होते. त्याठिकाणी एकसामाईक विहिर असल्याने त्या विहिरीमध्ये संदिप पाटील यांचेसह भिवा बुद्रुक यांचाही हिस्सा होता. भिवा बुद्रुक हा वारंवार तू हि जमीन करायची नाही, तू विहिरीवरची मोटार चालू करायची नाही, तुझा यात काय संबंध नाही अन्यथा तुला जीवे मारीन अशी धमकी देत वारंवार भांडत होता. रात्री कांतीलाल माने शेतात पाणी द्यायला गेले होते. सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान पत्नी अनुराधा शेतात गेली असता शेतातील विहिरीजवळ कांतीलाल माने रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
त्याच्याजवळ लोखंडी कोयता व काठी पडलेली होती. त्यामुळे भिवा संपत्ती बुद्रुक यानेच कांतीलाल माने यांच्या गळ्यावर, डोकीत व कपाळावर कोयत्याने वार करून ठार मारले असल्याची फिर्याद अनुराधा माने यांनी माढा पोलिस ठाण्यात दिली आहे. संबंधीत आरोपीवर अट्रॉसिटी व खुनाच्या गुन्ह्याअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली . घटनेचा तपास बार्शीचे पोलिस उपविभागिय अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या सह माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांच्याकडे असून यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपींना अटक करणेसाठी नागरिकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.