माजी मंत्री आमदार अमित देशमुख
यांची पणनमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी
शेतक-यांनी उत्पादित केलेला कापूस व इतर शेतीमाल कमी किमतीत विकला जाऊ नये, यासाठी, शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी त्यासंबंधी व्यापक प्रसिद्धी करावी, शेतक-यांची उत्पादकता वाढवण्याबरोबरच निर्यातक्षम माल तयार करण्यासाठीही बाजार समितीमार्फत शासनाने मार्गदर्शन यंत्रणा उभारावी आदी मागण्या माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केल्या.
शेतक-यांनी उत्पादित केलेल्या कापसाची सीसीआयमार्फत व्यवस्थित खरेदी होत नसल्याच्या संदर्भाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व इतर विधानसभा सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्याअनुषंगाने पणन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी मंत्रालयात संबंधित विधानसभा सदस्यांसमवेत बैठक आयोजित करून विस्तृत चर्चा केली. काही तांत्रिक कारणामुळे ९ फेब्रुवारी २०२५ रोजी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने सुरू असलेल्या काही कापूस खरेदी केंद्रावर खरेदी प्रक्रिया विस्कळीत झाली होती. मात्र त्यानंतर १२४ खरेदी केंद्रावर कापूस खरेदीची प्रक्रिया नियमित सुरू राहिली, अशी माहिती या बैठकीदरम्यान पणन मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली. या बैठकीस उपस्थित राहिल्यानंतर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शेतक-यांनी उत्पादित केलेला कापूस त्यानी कमी किमतीत विक्री करू नये, यासाठी कापूस खरेदी केंद्र, कधी आणि कुठे सुरू होणार आहेत, याची शासनाने व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करावी. शेतक-यांना कापूस उत्पादनातून फायदा मिळावा, यासाठी निर्यातक्षम कापसाची लागवड करण्यासाठीही शासन आणि बाजार समिती मार्फत मार्गदर्शन करण्यात यावे, कापूस व इतर शेतीमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य पद्धतीचे मार्गदर्शन करणारी यंत्रणाच शासन व बाजार समितीच्या वतीने उभारण्यात यावी, शेतीमालाच्या हमीभाव खरेदी केंद्रांना मंजुरी देताना त्यात होणारा गोंधळ संपुष्टात आणावा आदी सूचनाही या बैठकीदरम्यान आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केल्या.
पणनमंत्र्यांकडून सूचनांचे स्वागत
पणनमंत्री जयकुमार रावल यांनी या सर्व सूचनांचे स्वागत करून या संबंधाने योग्य कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही या प्रसंगी दिली. राज्यात नव्याने सुरू होत असलेल्या बाजार समित्या, बाजार समित्यांच्या कारभारातील अडचणी या संदर्भानेही बैठकीत विस्तृत चर्चा झाली, अशी माहिती माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी बैठकीनंतर दिली.