अहमदपूर : प्रतिनिधी
रविकांत क्षेत्रपाळे सध्या शेतक-यांच्या शेतीमालाचे भाव सोडून प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईचा आगडोंब उडाला आहे. शेतक-याला शेतीसाठी लागणा-या सर्व वस्तूचे भाव वाढले आहेत पण शेतक-यांच्या सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा या शेतमालाचे भाव जवळपास २०११ पासून म्हणजे १५ वर्षापासून जैसे थे असून भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादीचे सरकार हे शेतक-यांना उद्ध्वस्त करणारे, शेतक-यांना अडचणीत आणणारे सरकार असल्याची चर्चा शेतकरी करताना ऐकावयास मिळते आहे. शेतक-यांमध्ये सद्या प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळत असून यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्याचे ऐकावयास मिळत आहे.
सध्याचे महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०११ पासून शेतक-यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळावा म्हणून मागणी करीत होते. आता ते सत्तेत आहेत आणि त्यांच्या भाजपा पक्षाचा संकल्प पत्रात शेतक-यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. पण सत्ता आली की नेते मंडळींना जनतेच्या कामाचा विसर पडला आहे. सरकारला जनता, शेतकरी यांच्या कामाचे काही देणे घेणे नसल्याचे पहावयास मिळत आहे. सद्या मेडिसिन ,कपडा ,शैक्षणिक वस्तू ,किराणामधील साखर, तांदूळ, तेल ,डाळ, पेट्रोल, डिझेल, जनरल स्टोअर्स मधील वस्तू, खत, फवारणीचे औषध, सोयाबीन काढण्याचे भाव, मजुरांचे भाव वाढले, नांगरणीचे भाव वाढले, बियाण्यांचे भाव वाढले, सोने-चांदी, लोखंड ,सिमेंट ,वीट ,वाळूचे भाव यासह प्रत्येक वस्तूचे भाव बॅग, शाळेची फीस ,लग्न समारंभासाठी लागणारे साहित्य, बँड बाजा, चप्पल, बूट ,कटिंग सह, एसटीची दरवाढ आदी सह सर्व वस्तूंचे भाव वाढलेले आहेत. जवळपास २०११ पासून शेतक-यांच्या मालाचे भाव मात्र तेच असल्याचे पहावयास मिळते.
हे भाव का वाढू दिले नाहीत याला जबाबदार कोण ? शेतीमालाचे भाव न वाढण्याचे कारण काय, शासनाने जाहीर केलेले सोयाबीन, तूर, कापूस, हरभरा या शेतीमालाला किमान हमीभाव तरी आडत दुकानावर मिळवून देणे हे शासनाचे काम आहे.हे भाव लवकर वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेऊन शेतक-यांना हमीभाव मिळण्याची मागणी शेतक-यांकडून करण्यात येत आहे. शेतक-याच्या मालाला योग्य भाव मिळाल्या नंतर त्याला कुठल्याही निधीची शासनाकडून गरज नाही. कृषीप्रधान देश समजल्या जाणा-या या भारत देशात शेतक-याला सरकारने सध्या तरी चक्क वा-यावर सोडले आहे. सध्या औषधी, सोन्या- चांदीसह सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईने शेतकरी अक्षरश: होरपळून निघाला आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. मग शेतक-यांच्या मालाचे भाव पंधरा वर्षापासून वाढत नाहीत.