नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रियकराने अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचे अचानक निधन झाले आहे. श्रद्धाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. श्रद्धाची हत्या झाल्यापासून तिचे वडील डिप्रेशनमध्ये गेले होते. विकास वालकर असे श्रद्धाच्या वडिलांचे नाव असून वसईत राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे.
२०२२ मध्ये दिल्लीत श्रद्धा वालकरची हत्या झाली होती. तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने तिची हत्या केली होती. या हत्येचा खटला न्यायालयात सुरू आहे. आपल्या मुलीला मृत्यूनंतर न्याय मिळावा म्हणून विकास वालकर न्यायालयीन खटला लढत होते. यावेळी त्यांची प्रचंड धावपळ होत होती. तसेच ते सतत तणावात होते, असे सूत्रांनी सांगितले.
श्रद्धा वालकरच्या हत्येने संपूर्ण देश हादरून गेला होता. आरोपी आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करून मृतदेहाचे तुकडे दिल्लीतील वेगवेगळ्या भागात फेकले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याची कसून तपासणी केली असता त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवल्याचेही उघड झाले होते. फ्रिजमधून रोज काही तुकडे काढून ते दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात तो फेकायचा, असे पोलिस तपासात आढळून आले होते.