मुंबई : प्रतिनिधी : नुकतीच श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. आता या तरुण खासदाराला मंत्रिपद द्यावे अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालानंतर आता केंद्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. नरेंद्र मोदी हे तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. रविवारी ९ जूनला संध्याकाळी ७ वाजता दिल्लीत हा शपथविधी होणार आहे. यानंतर आता मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोण कोण असणार याची चर्चा आहे.
एनडीएतील घटकपक्षांना ४ खासदारांमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद असे सूत्र ठरल्याची चर्चा आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदं मिळण्याची चिन्हे आहेत. आता शिवसेनेच्या वाट्याला येणा-या मंत्रिपदामध्ये श्रीकांत शिंदे यांचा समावेश करावा, अशी मागणी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
नुकतीच श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे.
शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेत्यांमध्ये कोणताही वाद नको म्हणून काही खासदारांनी ही भूमिका घेतली. शिवसेनेच्या विजयी खासदारांमध्ये बुलडाण्याचे प्रतापराव जाधव, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, हातकणंगलेचे धैर्यशील माने, छत्रपती संभाजीनगरचे संदिपान भुमरे, मुंबई उत्तर पश्चिमचे रवींद्र वायकर असे सर्व वरिष्ठ नेते आहेत.
एकनाथ शिंदे यांना ७ जागा
लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७ जागांवर विजय मिळवता आला. यामध्ये कल्याणचे श्रीकांत शिंदे, ठाण्याचे नरेश म्हस्के यांच्यासह सात जणांचा समावेश आहे.
शिवसेनेचे खासदार
कल्याण लोकसभा – श्रीकांत शिंदे
ठाणे लोकसभा – नरेश म्हस्के
मुंबई उत्तर पश्चिम – रवींद्र वायकर
हातकणंगले – धैर्यशील माने
छत्रपती संभाजीनगर – संदिपान भुमरे
बुलडाणा लोकसभा – प्रतापराव जाधव
मावळ लोकसभा – श्रीरंग बारणे