28.2 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeलातूर‘श्री’स  एक हजार एक महिलांच्या उपस्थितीत रुद्राभिषेक

‘श्री’स  एक हजार एक महिलांच्या उपस्थितीत रुद्राभिषेक

लातूर : प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून यात्रा महोत्सवाचे आयोजन होत आहे. या महोत्सवानिमित्त  विविध कार्यक्रम पार पडत असून दि. ११ मार्च रोजी १००१ महिलांच्या उपस्थितीत ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरास रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी रुद्रपठणही केले. तसेच महिलांसाठी आयोजित पाक कला स्पर्धा व भजन स्पर्घेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. याचाच एक भाग म्हणून दि. ११ मार्च रोजी महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचे औचित्य साधत ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरास १००१ महिलांच्या उपस्थितीत रुद्राभिषेक करण्यात आला. या महिलांनी यावेळी सामुहीक रुद्रपठणही केले. यानिमित्ताने श्रीसिद्धेश्वराच्या गाभा-यात विविध फळांची आरास करण्यात आली होती. यानंतर ‘श्री’ ची महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. १००१ महिलांनी सामुहीक रुद्रपठण केल्याने देवस्थान परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमास देवस्थानचे प्रशासक सचिन जांबूतकर यांच्यासह विश्वस्तांचीही उपस्थिती होती.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महिलांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध भागातून महिला भजनी मंडळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. देवस्थान परिसरातच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच बरोबर महिलांसाठी पाक कलास्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून विविध पाक कलांचे सादरीकरण केले. या दोन्ही स्पर्धांसाठी परिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. या परिक्षकांच्या सूचनेनुसारच विजेते घोषित करण्यात आले. या विजेत्या महिलांना देवस्थानच्या वतीने रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.या स्पर्धेसाठी शुभदा रेड्डी व सुखदा मांडे यांनी विशेष पुढाकार घेतला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR