22.9 C
Latur
Thursday, October 2, 2025
Homeलातूरश्री रेणुकादेवीचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन

श्री रेणुकादेवीचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन

रेणापूर :  सिद्धार्थ चव्हाण
साडेतीन मुहूतपैकिी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दस-यानिमित्त ग्रामदैवत आदिशक्ती श्री. रेणुकादेवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. लाखो  भाविक भक्तांनी रेणुका मातेचे दर्शन घेतले .
रात्री देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रेणुकादेवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. ठिकठिकाणी रेणुकामातेच्या पालखीवर पुष्प वर्षाव करुन स्वागत करण्यात आले. ग्रामदैवत श्री. रेणुकादेवी मंदिराची ख्याती जागृत देवस्थान म्हणून आहे. महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक या राज्यातील भाविक मोठ्या श्रद्धेने मातेच्या दर्शनासाठी नवरात्र महोत्सवात येतात. नवरात्र व दसरा महोत्सवानिमत्ति मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने अकरा दिवस हा परिसर भाविक- भक्तांनी फुलून गेला होता. नवरात्र महोत्सवात रेणुका देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा तहसीलदार प्रशांत थोरात व कार्यकारी अध्यक्ष राम पाटील यांच्या हस्ते व परंपरागत पुजारी श्रीकांत (राजु) धर्माधिकारी यांच्या मंत्रघोषात व विश्वस्त , भाविक भक्तांच्या उपस्थितीत   दि. २२ सप्टेंबर  रोजी घटस्थापना करण्यात आली होती.
मंदिर परिसरात व बाहेर विद्युत रोषणाई करण्यात करण्यात आली होती. तसेच तुकाई देवी मंदिराकडे जाणा-या रस्त्यावर व मंदिर परिसरात हा विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे रेणापूर शहरातील लहान थोर महिला, पुरुष मंडळी पहाटे दर्शनासाठी येत असल्याने दूरहून चालत येणा-या भाविकाना आल्याबरोबर दर्शन घेता आले.  बुधवार दि. १ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे , तहसीलदार प्रशांत थोरात , राम पाटील , तलाठी दिलीप देवकते  कलीम शेख , विकास बुबणे  यांच्या उपस्थितीत  घट उठवण्याचा कार्यक्रम झाला. गर्दीमुळे काही भाविक देवीचे मुखदर्शन घेतात.अशा भाविकांना देवीचे दर्शन घेता यावे म्हणून विशाल गंगाधर पुणे  व विश्वस्त मंडळाने स्क्रीनवर लाईव्ह (मुख दर्शन) दर्शनाची व्यवस्था केली होती. दस-या दिवशी दर्शनासाठी येणा-या सर्व भाविकांना लातूर- रेणापूर  महामार्गावर बोरवटी, महापूर, राजेवाडी , पिंपळफाटा तसेच शहरात ठिकठिकाणी देवीच्या भक्ताकडून भाविकांना फराळाची व नाष्टयाची सोय करण्यात आली होती.
मंदिरात दर्शनासाठी येणा-या सर्व भाविकांना रेणापूर येथील आदिशक्ती रेणुका माता अन्नछत्र मंडळाकडून महाप्रसाद देण्यात आला. दरम्यान रेणुकादेवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा तहसीलदार प्रशांत थोरात व कार्यकारी अध्यक्ष राम पाटील, विश्वस्त मंडळ,पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम ,  मंडळ अधिकारी संजय गायकवाड, तलाठी कलीम शेख ,विकास बुमणे, गोविंद शिंगडे,  पुरोहित श्रीकांत (राजू) धर्माधिकारी व मानकरी यांच्या हस्ते रेणुकादेवी माते ची पूजा व आरती करण्यात आली. नवरात्र व पालखी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक  दतात्रय निकम , बीट जमादार विपिन मामडगे यांनी  चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR