22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरश्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी उत्साहात

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी उत्साहात

पंढरपूर : प्रतिनिधी
भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान म्हणून पंढरपूर प्रसिध्द आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शनिवारी रंगपंचमी मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विठुरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर ‘अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग’ या अभंगाची प्रचिती आली. यावेळी विठुमाऊलीचा जयघोष करण्यात आले. तसेच भक्तदेखील रंगात न्हाऊन निघाले.

वसंतोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रंगपंचमी. वसंत पंचमीपासून रंगपंचमीपर्यंत दररोज विठूरायाला पांढ-या पोशाखावर गुलाल टाकून पूजा केली जाते. सलग महिनाभर हा दिनक्रम सुरू असतो. या उत्सवाची सांगता रंगपंचमीला होते. त्यानुसार आज या वसंतोत्सवाची सांगताही झाली. यावेळी विठ्ठल भक्तांनी मोठी गर्दी केली होती. विठुरायाच्या जयघोष करीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विठ्ठलभक्त रंगोत्सवात दंग झाले होते.

रंगपंचमी दिवशी दुपारी ४.३० वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची पाद्यपूजा व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. देवाच्या अंगावर केशरयुक्त रंग व गुलाल टाकण्यात आला. त्यानंतर डफाची पूजा करून नामदेव पायरी-तुकाराम भवन, पश्चिम द्वार-चौफाळा -पश्चिम द्वार -व्हीआयपी गेट, नामदेव पायरी अशी मंदिर प्रदक्षिणा करून डफाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणुकीमध्ये रंगाची उधळण करून व मानक-यांना प्रसाद देऊन वसंतोत्सवाची सांगता करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR