30.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रश्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या चरणी सोन्याचा पोषाख अर्पण

श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या चरणी सोन्याचा पोषाख अर्पण

 

पंढरपूर /प्रतिनिधी
श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या चरणी नाव न सांगण्याच्या अटीवर दानशूर भाविकाकडून सोन्याचा पोषाख व चांदीने मढविलेले सागवानी लाकडाचे पाट अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठलासाठी तांबड्या रंगाची वेलवेट अंगी, अंगीच्या गळ््याला ३ पदरी मोत्याची माळ, गळपट्टीला सोन्याची चैन, खांद्याला दोन बाजूबंद, बंधाला मोत्याचे लटकन व सोने, दोन्ही हाताला ब्रेसलेट, प्रमाणित गोल मोत्याचे मणी व यामध्ये कौस्तुक मण्यासारखा मध्यभागी हिरवा मणी तसेच आंबा कलरचा शेला, त्यामध्ये मोत्याच्या सुरमण्या, त्यास सोन्या व मोत्याचे पूर्णपणे वर्क आहे. श्री रूक्मिणीमातेसाठी आंबा कलरची सिल्क पैठणी, सोन्याची ठुसी, मंगळसूत्र, जोडवे, पैजन, बांगड्या, नथ इत्यादी सौभाग्यचे लेणं अर्पण केले आहे.

याशिवाय २ सागवानी पाट चांदीने मढवून दिले आहेत. श्रींच्या पोषाखासाठी १० तोळे सोन्याचा वापर करून त्यासाठी सुमारे ११ लक्ष तसेच चांदीच्या पाटासाठी ४ किलो चांदीचा वापर व त्यासाठी ४ लक्ष रुपयाचा खर्च आला आहे. संबंधित देणगीदार हे श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेचे निस्सिम भक्त आहेत. यापूर्वी त्यांनी श्रींच्या चरणी चांदीची कळशी भेट दिली होती, असे यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

आषाढीच्या नित्यपूजेनंतर
परिधान करण्यात येणार
विठ्ठलभक्ताने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर हे मोठे दान केले आहे. मंदिर समितीने या भक्ताचे नाव उघड केलेले नाही. आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेला सोन्याचा पोषाख अर्पण केला आहे. आषाढी एकादशीच्या नित्यपूजेनंतर हा पोषाख घालण्यात येणार असल्याचे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR