लातूर : प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे बाजार समिती परिसरातील गौरीशंकर मंदिरापासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत मानाच्या काठ्यांची मिरवणूक काढण्यात आली. श्री सिद्धेश्वर यात्रानिमित्त दरवर्षी मानाच्या काठ्यांची मिरवणूक काढण्यात येते. यावर्षीही ही मिरवणूक काढण्यात आली. अश्व पथक, लेझीम पथक, मुलांचे व मुलींचे स्वतंत्र काठी पथक आणि विविध देखावे या मिरवणुकीत सहभागी झाले होते. गौरीशंकर मंदिर येथे देवस्थानचे विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले, सुरेश गोजमगुंडे, श्रीनिवास लाहोटी, बाबासाहेब कोरे, नरेश पंड्या, व्यंकटेश हालिंगे, विशाल झांबरे, ओम गोपे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते काठ्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ही मिरवणूक सिद्धेश्वर देवस्थानकडे रवाना झाली. बाजार समिती परिसरातून गुळ मार्केट, हनुमान चौक या मार्गे ही मिरवणूक सिद्धेश्वर मंदिरात पोहोचली.
तत्पूर्वी माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांच्या निवासस्थानी या काठ्यांचे पूजन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, विशाल गोजमगुंडे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह परिवारातील सदस्यांनी मानाच्या काठ्यांचे पूजन केले. याप्रसंगी परिवारातील सदस्य व आप्तेष्टांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तेथून वाद्यांच्या गजरात या काठ्या गौरीशंकर मंदिर येथे आणण्यात आल्या. मिरवणुकीद्वारे या काठ्या सिद्धेश्वर मंदिरात नेण्यात आल्या. सायंकाळच्या वेळी ही मिरवणूक मंदिरात पोहोचली.