29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रसंगमनेर विधानसभेतून सुजय विखेंचा पत्ता कट

संगमनेर विधानसभेतून सुजय विखेंचा पत्ता कट

अहिल्यानगर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेत आला होता. कारण या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला होता. मात्र ही जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली. शिवसेना शिंदे गटातर्फे अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे सुजय विखे पाटील यांचा निवडणुकीतून पत्ता कट झाला आहे.

सुजय विखे म्हणाले की, ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. ही जागा अगदी शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली. नगर जिल्ह्यात कोणती जागा कोणाला जाईल, अशा अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. महाराष्ट्रात ८ ते १० जागा शेवटच्या टप्प्यात उरल्या होत्या. या जागांबाबत वरच्या स्तरावर वाटाघाटी झाल्या. संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली.

मॅनेज न होणारा उमेदवार : सुजय विखे
शिवसेना शिंदे गटाकडून अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचे वैशिष्ट्य असे आहे की, मागच्या पाच वर्षांत त्यांनी सर्वसामान्य जनतेची अनेक कामे केली आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रस्थापितांना मॅनेज न होणारा उमेदवार आम्ही तिथे दिला आहे. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा काय करून दाखवू शकतो हे २३ तारखेला कळेल, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR