ठाणे : प्रतिनिधी
बेकायदा तपास करत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात बुधवारी राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे ठाणे गुन्हे शाखेने चौकशी केली. तसेच त्यांचा जबाबही नोंदवण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने दिली. याबाबत पांडे यांना विचारले असता वाटेल तसा गुन्हा दाखल केला आहे. चार वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्याचे नेमके कारण तरी काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मुंबईतील व्यावसायिक संजय पुनमिया यांच्या तक्रारीनंतर पांडे यांच्यासह माजी सहाय्यक पोलिस आयुक्त सरदार पाटील, तत्कालीन पोलिस निरीक्षक मनोहर पाटील, वकील शेखर जगताप, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल यांच्याविरुद्ध खंडणीसह अन्य कलमांतर्गत २६ ऑगस्ट रोजी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याच पोलिस ठाण्यात २०१६ रोजी दाखल गुन्ह्याचा बेकायदेशीर तपास चालू करत माझ्यासह अन्य व्यावसायिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आणि पैसे उकळले. शासनाचे खोटे पत्र तयार करुन विशेष सरकारी वकील भासवून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारदार पुनमिया यांनी केला होता. कट कारस्थान करुन निर्दोष नागरिकांची फसवणूक केल्याचे तक्रारीमध्ये नमूद आहे. या गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे शाखेकडून केला जात आहे. आज यासंदर्भात पांडे यांची चौकशी करण्यात आली.