मुंबई : प्रतिनिधी
ठाकरे गटाचे नेते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ‘नरकातील स्वर्ग’ या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे निमंत्रण देण्याकरता ही भेट घेण्यात आली आहे. या भेटीचे फोटो शरद पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ट्वीट करत शरद पवार म्हणाले, ‘‘राज्यसभेचे खासदार तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या वेळी त्यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले.
या भेटीदरम्यान रोहन तावरे यांनी लिहिलेल्या वन्यजीवनावर आधारित पुस्तकावर सविस्तर चर्चा झाली. त्याचप्रमाणे, राज्य व देशातील विविध मुद्यांवरही विचारमंथन झाले. भेटीनंतर मी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.’’
संजय राऊत लिखित ‘नरकातला स्वर्ग ’ या पुस्तकाचे प्रकाशन १७ मे रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे. कवी, गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. दोन वर्षांपूर्वी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. शंभर दिवसांतील तुरुंगातील या अनुभवावर हे पुस्तक आधारित आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये हे पुस्तक आहे.