बीड : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (४४) यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी करत आहेत आणि याबाबत दररोज नवीन खुलासे होत आहेत. याचदरम्यान आता संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी नुकताच सीआयडीच्या अधिका-यांसमोर जबाब नोंदवला होता. या जबाबात अश्विनी देशमुख यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक महिना आधी त्यांना वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेकडून धमकी देण्यात आली होती. जीवे मारण्याची धमकी दिल्याने संतोष देशमुख अस्वस्थ होते असा जबाब पत्नी अश्विनी देशमुख यांनी दिला आहे. देशमुख यांना नोव्हेंबर महिन्यात धमकी मिळाली होती. त्यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान,९ डिसेंबर रोजी ही निर्घृण हत्या झाली असून संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि नंतर मृतदेह ४० किलोमीटर अंतरावर फेकून दिला. या घटनेला एक महिन्याहून अधिक काळ उलटून गेला आहे तरी या हत्येचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकूण ८ जणांना अटक केली.
अश्विनी देशमुख यांच्या जबाबानुसार, नोव्हेंबर महिन्यात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली होती. तेव्हापासून संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ होते. अश्विनी देशमुख यांचा हा जबाब ३ जानेवारीला नोंदवण्यात आल्याचे समजते.
सीआयडीने याप्रकरणात वाल्मिक कराड वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का लावला होता. मात्र, वाल्मिक कराड यांच्यावरही मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करून सीआयडीच्या तपासाचा निषेध करण्यासाठी टॉवरवर चढण्याची प्रत्यक्ष घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर मस्साजोग गावात असलेल्या टॉवर कॉम्प्लेक्समध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लक्ष्मण हाकेंना धमकी
संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधामुळे टीकेची लाट उसळली होती. मात्र, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे यांचा बचाव केला होता. याच लक्ष्मण हाके यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारच्या पत्रकार परिषदेपूर्वी लक्ष्मण हाके यांना धमकी देण्यात आल्याचे समजते. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून फोनवरून धमकी देण्यात आल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.